अनुवाद साहित्य आणि अंदमानचे स्वप्न’: अंदमानची सफर घडविणारे प्रवासकथन
Main Article Content
Abstract
बहुभाषिक असलेल्या अमृत यार्दी यांचे अनुवादाच्या क्षेत्रात कार्य महत्त्वपूर्ण आहे. अनुवादामुळे एका भाषेतील साहित्य इतर अनेक भाषांमध्ये येणे फार महत्त्वाचे असते. एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत, त्या शब्दातील, वाक्यातील आणि लिखाणातील भाव, विचार आणि दृष्टिकोन त्यांच्यासहित नेमकेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अनुवाद होय. अनुवाद ही कला आहे तसेच त्याचे शास्त्र आणि तंत्रही आहे. सृजनशीलता आणि अभ्यास यांच्या योगाने या क्षेत्रात यश मिळविता येते. अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला ‘मूळ भाषा’ किंवा ‘उगम भाषा’ अथवा ‘स्रोत भाषा’ म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला ‘लक्ष्य भाषा’ म्हणतात.
चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. अर्थात हे काम करताना अभ्यासाने हे ज्ञान वाढत जाते. अनुवादकाला दोन्ही भाषांतील व्याकरणाचेही ज्ञान असावे लागते. विशेषतः सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अनुवादकाला स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची भाषिक, सांस्कृतिक जाण, बोलीभाषा पद्धती यांचीही आवश्यक ती माहिती असायला पाहिजे.
बरेचदा भाषांतर आणि अनुवाद ह्यांना एकसारखेच स्थान दिले जाते. मात्र तसे नाही. भाषांतर आणि अनुवाद ह्यांच्यातला फरक खरेतर तसा सूक्ष्म आहे; पण फार मोठ्या अर्थाचा अनर्थ सुद्धा करू शकतो. भाषांतर करताना मूळ शब्द अथवा वाक्यरचना जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जसे एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेतील शब्द योजणे. एकेका शब्दापुरते भाषांतर मर्यादित वाक्यरचनांचे भाषांतर करत असताना, शब्दाला शब्द हा दृष्टिकोन ठेवल्यास मूळ वाक्यांच्या आणि लिखाणाच्या भावार्थाचा ऱ्हास घडून येतो. अनुवाद मूळ लेखनाचे शब्दशः रूपांतर न करता त्यातला मथितार्थ समजून घेणे व सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती योग्य रितीने अनुवादात उतरविणे आवश्यक असते.
या दृष्टीने डॉ. अमृत यार्दी यांनी अनुवादाच्या क्षेत्रात यश गाठलेले आहे. हे ‘अंदमानचे स्वप्न’ या अनुवादावरून कळते. रहमत तरीकेरे यांचे कन्नड साहित्य विश्वातील नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म १९५९ सालचा. ते कन्नडमधील महत्त्वाचे समीक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ते कन्नड विद्यापीठ हंपी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘अंदमानचे स्वप्न’ हे प्रवासवर्णन खूप गाजले. ह्या प्रवासवर्णनाचा मराठी अनुवाद धारवाड येथील डॉ. अमृत यार्दी यांनी केलेला आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
References
‘अंदमानचे स्वप्न’ मूळ कन्नड: रहमत तरीकेरे, मराठी अनुवाद: डॉ. अ. रा. यार्दी.
अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती जून २०१८.